Friday, June 12, 2020

ओढ़

ही कसली अनाम ओढ़
सतत बिलगून असते
मन गाभाऱ्याच्या  आत
ती सरकन कैसी शिरते

मग उनाड होते सारे
उन्मळून पडतो धीर
मनातील गोंधळ तेव्हा
नेमका होतो अधीर

अशावेळी स्मरतात 
आईचे ते बोल
सावरावे ठेचण्याआधी
न पडता विचारात खोल

वावटळीत विचारांच्या
ती ओढच हरवून जाते
मन शोधत असते तेव्हा
एक अनाम अल्लड नाते

नात्यांच्या गुंत्यामध्ये
मी गुंततो पुन्हा जेव्हा
अवचित दिसते मजला
ती अबोल ओढ़ तेव्हा

मग कळते सारे सगळे
उलगडताच साऱ्या गाठी
ही  तर ओढ़ होती
माझी तुझ्याचसाठी

                              - सौरभ नेने 

Thursday, June 11, 2020

प्रेमाची गोष्टं


दिवसास विचारले जेव्हा
तुज सवाल इतका आहे
का ऒढ इतुकी तुजला
रात्रीची अनाम आहे

दिवस म्हणाला तेव्हा 
तुज कळणार कधीही नाही 
प्रेम करणे कारण 
शिकविले जात नाही 

दिवसा मागे रात्र 
का होते कळले तेव्हा   
प्रकाशाच्या हाती हात  
अंधार देतो जेव्हा 

मी दिवस होतो सखे ग 
तू हो रात्रीची काया 
ह्या आयुष्यावर पाडू 
आपुल्या प्रेमाची छाया 

तेव्हा विचारीन पुन्हा मी 
दिवसाला चोख पणाने
रात्रीला भेटण्यासाठी 
का विरतोस आनंदाने  

तोही हसेल खुद्कन गाली 
म्हणता म्हणता मजला 
अरे तुलाच कळले नाही 
तू प्रेमाचा धडा शिकला  

                                   - सौरभ नेने 

Thursday, December 18, 2014

तू मला पहिले.... मी तुला पाहिले

प्रश्न:   तू मला पहिले....मन हे भाळले
           का कसे सांग ना..प्रेम अन जाहले

उत्तर:  मी तुला पहिले....मन हे भाळले
            गुंतल्या भावना...प्रेम अन जाहले

प्रश्न:   भेटली प्रीत ही...मेघ अन दाटले
           का कसे सांग ना....प्रेम अन जाहले

 उत्तर:  बरसले मेघ अन ...चिंब मी न्हाइले
             गुंतल्या भावना...प्रेम अन जाहले

 प्रश्न:  गोठल्या ह्या दिशा....क्षण हि स्थिरले
          का कसे सांग ना...प्रेम अन जाहले

 उत्तर:  स्तब्ध्ले मी जरी....श्वास झंकारले
             गुंतल्या भावना...प्रेम अन जाहले

प्रश्न:   पापण्या स्पर्शल्या...ओठ अन लाजले
          का कसे सांग ना...प्रेम अन जाहले  

 उत्तर:  बोलण्याआधी जणू , ओठ हे बोलले
            गुंतल्या भावना...प्रेम अन जाहले

प्रश्न:   बावरी वेळ ती...सावळे गीत हे...
          का  कसे सांग ना...प्रेम अन जाहले

 उत्तर:  ऐकता गीत हे...मन्मना वाटले
             गुंतल्या भावना...प्रेम अन जाहले


Tuesday, October 22, 2013

आनंदाश्रम.....२

"बाबाकाका बाबाकाका ......हे बघ मी चित्र काढलाय.....इशा धावत माझ्याकडे आली...
अरे वा बघू तरी आमच्या ईशाने काय काढलय ते....
मी ते चित्र हातात घेतलं.....त्याकडे हलक्या नजरेनी पाहिलं.....माझे डोळे थक्क झाले.....तिने स्वतःचच चित्र काढल होत...... पण त्याबरोबरच तिने आनंदाश्रमातील  दोन झाडं काढली होती......एका झाडावर लिहिल होतं ...'आई' आणि एका झाडावर लिहिल होतं 'बाबा'..... दोन सेकंद डोळ्यातले आश्रू अनावर झाले.....सई तेवढ्यात म्हणाली....बघू मला पण बघू दे!

तिने माझ्या हातातून ते चित्र घेतलं.....मी दोन मिनिट ईशाकडे पाहिलं.....तिला घट्ट मिठी मारली....आणि म्हणालो.....धन्य आहेस बाळ तू.....

"बाबाकाका एक विचारू..?
हो विचार कि....
बच्चू म्हणजे काय रे?
काय? बच्चू? अम्म्म्म....बच्चू म्हणजे लहान मुलगा अगर लहान मुलगी....
म्हणजे माझ्यासारखी?
हो अगदी तुझ्यासारखी, गोंडस, हुशार आणि थोडी खोडकर सुद्धा....
पण दुनियादारी सिनेमात तर ती शिरीन त्या श्रेयसला बच्चू कशी म्हणते मग...?
तू कधी पाहिलास दुनियादारी इशा?
अरे तुझ्याच tab मध्ये पाहिला काल....तू दिलेलास ना मला गेम खेळायला तेव्हा...पण तू ते सोड.....सांग ना मला.....ती बच्चू कशीकाय म्हणते?
आग राणी....जर तुझ्या जवळच , अत्यंत लाडक कोणी असेल ना तर त्याला लाडानी पण बच्चूच म्हणतात.....
हो? मग आईकाकू पण तुला बच्चू म्हणते?

तिचा पुढचा प्रश्न तयार होता .....ते ऐकून मी जरासा बिचकलोच .....काय अफाट हि बुद्धी , तल्लखपणा,

सांग ना बाबाकाका ....बरोबर आहे ना?

हो एकदम बरोबर आहे....मी मनात म्हणल.....आज कालची पिढी म्हणजे तुफान आहे.....
 
"आईकाकू, तू तर कधीच म्हणल नाहीस बाबाकाकाला बच्चू माझ्यासमोर... ?"

चला इशा....आता आपली आवरायची वेळ झाली.....बाहेर जायचय  ना......मग आवर पटकन....
हो कि नाही रे बच्चू....

सईने मला बच्चू म्हणल आणि त्या निरागस चेहऱ्यावर जी काही हास्याची चमक आली.....हिऱ्याची लकाकीही फिकीच त्यासमोर

हो हो....अर्थात...चला पटकन आवरा ....

कुठे जायचं आहे पण आपल्याला आईकाकू?

आग आनंदाश्रम

आनंदाश्रम....yesssss........hurrey....म्हणजे आज मी आई बाबांना भेटणार.....अस म्हणून इशा तयारीला गेली....

अरे हो....आनंदाश्रम.....तुमची ओळख करून देतो....

आनंदाश्रम म्हणजे  जिथे खुद्द आनंद आश्रयासाठी येतो....जिथे माणूस नात्यांसाठी नाही तर नाती माणसासाठी पायघड्या घालतात.....जिथे बालपण, तारुण्य आणि म्हातारपण ह्याचं मिश्रण होऊन एक नवीन वय तयार होत.....हो तोच...आनंदाश्रम......माझ्या आईबाबांचं स्वप्न.......माझा वर्तमान......आणि हो इशासारख्या असंख्य लोकांचा "आनंद्काळ.."


  

Thursday, October 17, 2013

आनंदाश्रम.....

संध्याकाळ झाली होती....मी चहा पीत बाल्कनीत बसलो होतो.....सूर्याच आसपास कुठेही नामोनिशाण दिसत नव्हत....आकाश जणू काही काळ्याभोर ढगांनी पुरत व्यापुन टाकल होत..मधेच विजांचा गडगडाट तर मधेच पक्ष्यांचा किवकीवाट कानी पडत होता....हे वातावरण जणू कोणीतरी कुठेतरी खूप दुःखी आहे तर कुणीतरी कुठेतरी चिंब भिजण्यासाठी उत्सुक आहे अशी प्रचीती करून देत नेहमी मला ....मी चहाच्या प्रत्येक घोटागणीक त्या वातावरणाशी एकरूप होत चाललो होतो....

"चहा कसा झालाय?", साखर पडलीये ना बरोबर?, माझ्याहातून कमी पडते म्हणून विचारलं....

मी मागे वळून पाहिलं.....नेहमीप्रमाणे काहीच न बोलता.....सईच सगळ बोलण मला ऐकू आल होत...तिचे डोळे बोलतातच मुळी इतक्या जोरात .....

"चांगला झालाय चहा"

" पाऊस येणारे खूप जोरात....मी सगळे कपडे आत घेते नाहीतर उगाच ओले होतील....तू आज कसाकाय एवढा निवांत...."

अरे हा पाउंस का येत नाहीये....पटकन येवून कोसळून जाऊ दे....कुणाच मन किती हलक होईल....त्याच दुःखं ह्या सारीन्बरोबर वाहून निघून जाईल.....तर कोणीतरी त्यात चिंब होऊन तृप्त होईल....

पण पाउस येतच नाहीये...

सगळ नेहमी इतका सोप नसत....श्रेयस....

म्हणजे

काही नाही.....

आज ईशाच्या पोलिओ डोस ची तारीख आहे....तिला नेयच आहे.बूथ वर ....पाउस येयील तेव्हा येयील.....आपल्याला निघायला हवय....

मोरे काका सकाळीच गेलेत....आश्रमात......जोशी आजींना अस्वस्थ वाटत होत....डॉक्टरांना घेऊन गेलेत.....
तिथेपण जाव लागेल आपल्याला ...चल पटकन आवर.....

सई......खरच .....लहानपण आणि म्हातारपण किती सारख आहे हे कस लोकांना कळत नाही...काही लोक लहानपाणी लोक सोडून जातात तर काही लोक म्हातारपणी लोक सोडून जातात....आज मला कळतंय....देवाने दोन वेळा आपल्याला बालपण जगायचा chance दिलाय......लोकांना हे जेव्हा कळेल ना तेव्हा बघ आपल्या सारख्या लोकांची गरजच उरणार नाही....

तेवढ्यात बेल वाजली....सईने दार उघडल....

" श्रेयस बघ कोण आलय........  

Wednesday, July 10, 2013

गझल.....

उजाडलेल्या सूर्याची किरणे शोषत होतो..
रात्रीची चाहूल घेऊन आलीस तू तेव्हा...

मनातल्या मनात चार शब्द जुळवत होतो...
गीत बनून ओठी आलीस तू तेव्हा...

गुंतलेल्या धाग्याची उकल शोधत होतो
गाठ बनून हाती लागलीस तू तेव्हा....

गुरफटलेल्या आयुष्यात राम शोधत होतो
सीता बनून तू भेटलीस मला तेव्हा

स्वतः मधले स्वत्व आरशात पाहत होतो...
सावली म्हणून तू दिसलीस कशी तेव्हा ?

गंधाळलेल्या फुलांमध्ये, सौरभ शोधत होतो
सरींसवे मातीत विरून , गंधाळलीस ग तेव्हा

रमलो होतो मिठीत कवितेच्या ग राणी
ओठ तुझे गाली स्पर्शून गेलीस ग तेव्हा


                                                               सौनिक

Sunday, July 7, 2013

काळ

काळ ....सरत जाणारा.....
आयुष्यात रुतत जाणारा...
क्षणांशी स्पर्धा करणारा ....काळ

पक्ष्यांसवे  सरकन उडणारा...
सरींसवे  चिंब भिजणारा
अनोळखी वाटेवरती हात हाती देणारा ....काळ

क्षितीजापारी अथांग असणारा...
समुद्रापरी निवांत असणारा
वाऱ्याच्या प्रत्येक लाटेवरती वाहणारा ......काळ

डोळ्यातली सारी स्वप्नं जाणणारा
 घडणारी हर गोष्ट पाहणारा...
जीवनातली प्रत्येक वेळ  जगणारा.....काळ.

काळ.....नेहमी वेळेबरोबर राहणारा...
घड्याळाबरोबर घडणारा
नकोतीथे...नको त्यावेळी बदलणारा.....काळ.....

                                                                       
                                                                         -  सौनिक